इंग्लिश
मिंग्लिश!
नमस्कार मित्रांनो. आपण जरी आपल्या प्रिय भारत देशात राहत असलो तरी
बऱ्याचदा असे ऐकायला मिळते की निम्मी जनता इंडियात राहते आणि निम्मी जनता भारतात
राहते. याचा संदर्भ अर्थातच इंग्रजी शिक्षणाशी असतो. इंग्रजीचं शिक्षण घेऊन पुढे
गेलेले भरपूर जण तोऱ्यात वावरत असतात, आणि ज्यांना हे वाघिणीचे दूध मिळाले नाही, मिळू शकले नाही किंवा
पोहोचू शकले नाही, अशी
भोळीभाबडी जनता बिचारी तथाकथितरित्या मागे पडते. फायद्याच्या सगळ्या जागा मग या
तथाकथित पुढारलेल्यांना मिळतात आणि ज्यांचे शिक्षण अर्ध्यावर मागे पडले, त्यांना निम्न स्तरावरच जीवन
जगावे लागते.
शिक्षणाच्या
दृष्टीने विचार केल्यास इंग्रजी विषयाची धास्ती घेतलेली मुले नंतर इंग्रजी भाषेत
प्रवीण होत नाहीत आणि मग अर्थातच त्या भाषेची त्यांची जवळीक होत नाही. परिणामी ती
मागे पडतात. या लेखमालेचा एक हेतु ही दरी बुजवणे आहे.
आपली मराठी
भाषा आहे तशीच इंग्रजी सुद्धा एक भाषाच आहे.जगातील कितीतरी अधिक लोकसंख्या इंग्रजी
बोलते. का? अर्थातच, ती भाषा सोपी आहे म्हणून!
परंतु आपल्याकडे मात्र मुद्दाम ती भाषा खूप अवघड आहे असा बागुलबुवा उभा केला जातो.
परंतु गेल्या पंचवीस वर्षांच्या अनुभवावरून मी ठामपणे सांगू शकतो की इंग्रजी ही एक
खूप सोपी अशी भाषा आहे!
ह्या
लेखाच्या माध्यमातून इंग्रजी ही भाषा कसे सोपी आहे, आणि आपण सर्वजण ही भाषा कशी करू शिकू आणि वापरू
शकतो, मुलांचे इंग्रजी किती सहज
सोपे होऊ शकते या गोष्टींचा उलगडा करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. गेल्या वीस
वर्षांपासून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये 'इंग्रजी सोपे आहे' या विषयावरची शेकडो व्याख्याने देण्याची मला संधी
मिळाली. त्या व्याख्यानांच्या माध्यमातून इंग्रजी अवघड वाटण्यामागील नेमक्या अडचणी
मला समजून घेता आल्या. म्हणूनच मलाही लेखमाला लिहिताना मनस्वी आनंद होत आहे.
छोट्या छोट्या गोष्टींपासून तर महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या इंग्रजीतील सर्व
मुद्द्यांचा त्या लेखमालेत च्या माध्यमातून आपण उहापोह करणार आहोत. मी इथे कोणतीही
शिक्षकी भाषा वापरणार नाही, तर खेळीमेळीच्या वातावरणात आणि
चर्चेच्या, गप्पागोष्टींच्या
माध्यमातून ही भाषा आणि तिचं सौंदर्य उलगडणार आहोत.
चला तर मग एक नवी सुरुवात करूया. इंग्रजीची धास्ती घेऊन नव्हे तर
इंग्रजीशी दोस्ती करण्यासाठी हात पुढे करूया. तिची गुलामी करण्यासाठी नव्हे, तर मालक बनण्यासाठी सज्ज
होऊ या. आपली माय मराठी ही सर्वार्थाने थोर आहेच, परंतु त्याचबरोबर संपूर्ण जगभर वापरली जाणारी
इंग्रजीसुद्धा आपल्या हाताशी असली पाहिजे. या लेखमालेचा हा हेतू आहे.
आपण समाज माध्यमांच्या माध्यमातून दररोज एकमेकांच्या सोबत आहोतच
परंतु या लेखमालेच्या निमित्ताने दर रविवारी आपली नव्याने भेट होणार आहे. गेल्या
कित्येक वर्षांच्या अभ्यासामधून हाती आलेला भाषेचा गोडवा पुढच्या पिढीपर्यंत
सोपवण्यासाठी ही लेखमाला केवळ एक निमित्तमात्र असेल असे विनम्रपणे नमूद करतो.
मित्रहो भेटूया पुढच्या रविवारपासून एका आगळ्यावेगळ्या लेखमालेसह. थोडं इंग्लिश
थोडं मराठी म्हणजेच आपलं... इंग्लिश; मिंग्लिश!!
- Prof. Raj Shelke
(बिझिनेस
इंग्लिश,केम्ब्रिज.)
9423542224
---------------------------------------------------------------------
2 Comments